मोर


मोर

मोर शहराचे काहीच लागत नाहीत. किंबहुना शहराआधीच्या जमीनीतले मोरांच्या पायाचे ठसे आता अश्मीभूत झालेले आहेत. मोर आता कुठे राहतात कुणास ठाऊक? तशा त्यांना बघितल्याच्या दंतकथा ऐकू येतात अधुनमधुन. उसाचे गच्च फड गाभा लपवून उभे असतात, गाभ्यातल्या मोरांच्या श्रीमंतीने जास्तच खोल आणि अनाकलनीय वाटत्तयला लागतात. ए-हवी, कवितेतल्या एखाद्या रसहीन तपशिलासारखे हे फड अचानक मोर असल्याच्या आभासानं गूढ बनून जातात. त्याचा गाभा उकलण्याची वाट बघत व्याकूळ व्हायला लावतात. पावसात त्यांच्या पिसार्यांच्या आणि नाचांच्या दंतकथा हिरव्याकच्च गारव्यासारख्या भवताल व्यापून टाकतात. मग कुठलाही झाडांचा निबिड कोपरा बघितला की धुंवाधार पाऊस पडणार आणि झाडांच्या पावळण्यांखाली मोर नाचू लागणार असं वाटायला लागतं. मोर म्हणजे माया. आदिवासींच्या आदिम चित्रांपासून ते पुस्तकातल्या अलवार पिसांपर्यंत. मोर संदर असताता लांडोरींसह, त्यांच्या विद्रूप, राकट पायांसह, पिसातल्या डोकाऊन तळ शोधणा-या डोळ्यांसह. पावसासह आभाळ झेलणा-या तरुण मुलींसारखे. तसा आठवणी काढण्याइतका मोरांचा सहवास कधीच लाभला नाही. कधीही हाताला न लागणा-या, दूरस्थ अभावासारखे लवलवते लावण्य, शाळेच्या पुस्तकात छापलेल्या रम्य निसर्गचित्रासारखे अप्राप्य राहिले. मोरांची पिसं मात्र भेटत राहिली, एखादं आवडतं गाणं संपल्यावर रंगाळणार्या सुरांसारखी किंवा गणपती विसर्जन केल्यानंतर उरणार्या मखरासारखी. सुटून गेलेल्या रेखीव संदर्भांइतकीच रेखीव आणि डोळ्यातल्या ओलेपणावर अलवार तेजानं गूढगर्भाचं आवार उजळून टाकणारी पिसंच भेटली. मोरांशिवाय. मोर फक्त दिसले, पानमळ्याच्या घट्ट गर्दीमधे अस्फुट, नदीकाठच्या दाट बनातुन अर्धोन्मलित, पुढच्या फुलतेपणाची आशा दाखवून अर्धेच फुलून अंतर्धान पावणारे, कुरूप पायांचे भरजरी जीवसंचित. आणि मोर तरी किती प्रकारचे असावेत? पिंज-यातल्या नाचानं वेदनांची लय पकडणारे, विद्रूप गाण्यांमधे पिसा-यांनी जीव ओतणारे, वाळवंटातल्या सुबध्द शहरामधे थव्यानं फिरणारे, विरहिणींच्या दु:खावर पाखर घालणारे, राजस्त्रियांच्या स्नानात सोबत करणारे, राधेच्या मैत्रिणींबरोबर कुंजवनात बागडणारे, मिटलेल्या पिसा-यानं एखाद्या प्रतिभावंत चित्रकाराची आश्वसक रंगभाषा वाटावी इतका लयबध्द आणि फुलवल्या पिसा-यानं आतल्या उत्कटतेचं वलयाकार गाणं वाटावं इतका चतुरस्त्र शरीरसंभार अनवट लयीच्या उलगडतेपणासारखा भोगणारे मोर ! असंख्य मोर. त्यांच्या बद्दल खूप विचार केला की लहानपणापासूनचा एकेक मोर आठवायला लागतो. एकदा असाच एक पांढरा मोर अनवधानानं आमच्या गल्लीत शिरला. पांढ-या मोराचा विलक्षण वेगळेपणा बघून माणसांचा जथाच लागला त्याच्या मागं. मोराचं अनावर आकर्षण आणि त्याच्या पांढरेपणाची लालसा. माणसांनी लालसेचे हात केले आणि मोराच्या मागे जीव खाऊन धावायला लागली. त्याच्या मनातली मोराची हिरवट-निळी मखमली प्रतिमा समोर दिसणा-या उजळ पांढरेपणाच्या पार्श्वभूमीवर जास्तच लखलखित झाली. मोर आपल्या मर्यादेत उडत होता, एकेक छप्पर पार करत. माणसांची लालसा जास्तच लाल व्हायला लागलेली. माणसं तरी काय करणार होती मोराला पकडून, लालसा संपली की त्यांना पांढरेपणाचा दुस्वास वाटला नसता काय? मान मोरावर ठेऊन माणसांच्या पायाखालून रस्ते झपाट्यानं मागं सरकायला लागलेले. लहानपणातलं अफाट आकर्षण आणि माणसांच्या लालसेनं भारलेलं आवार. मोरामागून माणसं शहरसोडून बाहेर आली. आता फक्त शहराबाहेरचा विस्तीर्ण तलाव आणि त्याच्या काठचं गच्च रान. माणसं मांजरीच्या शिवशिवणा-या नखांसारखी आक्रमक झालेली आणि मोर भयानं आकसलेला. मोरानं जिवाच्या आकांतानं झेप घेतली आणि तलावाकाठच्या रानात मिसळून गेला. हिरवेपणाच्या माहेरात सुरक्षीत. कुणीतरी चेटुक करून प्राण खेचावेत तशी माणसं संज्ञाहीन, ठोकल्यासारखी उभी राहिली जणू तो दिवस उजाडण्याचा उद्देशच वांझ झाला असावा. त्यानंतर शहरात वाट चुकून कधीच मोर आला नाही. माणसच येत राहीली. शहर तलाव ओलंडून पलिकडं पोहोचलं. काठावरचं रान कापलं गेलं मुळापासून. म्हणून वाटतं मोर शहराचे काहीच देणे लागत नाहीत. नुस्त्या दंतकथा चिरेबंदी भिंतीसारख्या. खूप जंगल पायाळलं की चाहूल देणारे मोर जवळ गेलं की उंच झाडाची एकेक फांदी चढत टोकाला पोहोचतात. मग खालून दिसतं आभासाच्या अनादी सौंदर्यानं आरेखित होणारं मायाजाल. खूपजण भेटतात, मोरांचा नाच बघितल्याचे सांगतात, सांगताना स्वत:च मोर झाल्यासारखे वाटतात. आकाशातून चैतन्न्याच्या औचित्त्याचं रहस्य उलगडू बघणारा पाऊस कोसळतांना चैतन्न्याच्या निळ्या आल्हादातून फुटलेला रसवंत कोंब म्हणजे मोर. मोर नाचतो भविष्यातले मोर जन्माला घालण्यासाठी. कुरूप पायांवर अद्भुत सुंदरपणा उगवून आणण्यासाठी. मोर नाचतो दररोज नव्यानं मोर होण्यासाठी. मोर जन्मकारण म्हणुन नाचतो जिवापाड आणि लांडोरींच्या पिळदार वेणांनी प्रत्यक्ष जन्मतो. लांडोर पोटात सांभाळते एक धुंवाधार पाऊस आणि पावसाच्या सोबतीनं वाढवते पावसात नाचणारे मोर, मोरा-पावसांना सांभाळणार्या लांडोरी. इतकं करुनही मोर दिसत नाहीत आणि दिसतात तेंव्हा शहरातून स्थलांतर करण्याच्या अस्थिर हालचालींनी अस्वस्थ झालेले असतात. मोरांनी शहरात सोडलेल्या पिसांनी शहर श्रीमंत होतं. बाळांचे पाळणे नटतात, चित्रातल्या कृष्णांचे मुकुट नटतात, पिसं देण्याघेण्याच्या निमित्तानं माणसं आपापसातलं स्नेह वाढवतात.
इथं इथं बैस रे मोरा
तुला घालतो चारा
चारा खा पाणी पी भुर्ररररररकन उडून जा......
म्हणजे बाळांचे मोरही कधीच कायमचे रहात नाही आणि चारा पाणी देणारी बाळं ही त्यांना कायमचं थांबवून घेत नाहीत. चित्रात-गाण्यात माणसाच्या विलक्षण जवळ असणारे मोर प्रत्यक्षात मात्र एवढे लांब का, की त्यांच्या विषयीच्या मखमली आकर्षणानं एक खोल दरी निर्माण केलीय आणि त्या दरीतून जातांना माणसांच्या पावलांना आपोआपच हिंसेचा लाल रंग येतो? मोर लांब असतात इतकच खरं शेवटी. मग असेच एक दिवस अचानक शहराबाहेर मोरांचे थवे दिसू लागले. शहराबाहेर नव्यानं तयार झालेल्या तळ्याकाठच्या घनदाट झाडीतून नृत्यवत पावलं टाकत पाण्यावर येणारे मोर, अंगात एखाद्या अज्ञात बंदिशीची लय भरावी तशी अनपेक्षित सम गाठत मोर थव्यानं फिरायला लागले. मागच्या पांढ-या मोरानं वेडी केलेली पिढी आता पिकलेली, पण लालसेचा अनुवंश घेऊन जन्मलेले होतेच काहीजण, काहीजण मोरांच्या सहवासाविना तहानलेले. पांढरा मोर अदृष्य झालेल्या तलावाच्या विरुध्द टोकाला असणा-या तळ्याकाठी मोर आले तेंव्हा शहरात आश्चर्य पसरलं. माणसं तळ्याकाठच्या झाडांसारखी घनदाट झाली आणि विचार करायला लागली, मोरांचं काय करायचं? त्यांना आकंठ बघायचं, त्यांची पिसं बळजबरीनं हिसकाऊन घ्यायची का पिसं गळण्याची प्रतिक्षा करायची ? माणसांनी पुढच्या पंज्यांवर दबा धरला. नाकाची टोकं मोरांच्या दिशेला वळवली, मग त्यांना मोरांची स्वप्न पडायला लागली. देवीला वाहून नेणारे, वारल्यांच्या चित्रातले रेषांचे, जंगलांच्या वृत्तचित्रांना मुखपृष्ठ होणारे, ढगांशी वारा झुंजला की नाचणारे. पण माणसांना एकही जिवंत मोर जमिनीवर बघितल्याचे आठवेना. शहर आणि तळ्याकाठचे मोर यांच्यात स्वीकार-नकाराची विलक्षण ओढाताण तयार झाली. आता पावसाळा तोंडाशी आलेला असतांना शहरात एक विलक्षण रहस्य तयार झालय. लक्षावधींच्या संख्येनं वाढणा-या एकपेशीय जिवांसारखी या रहस्यानं शहराची प्रत्येक पेशी काबीज केलीय. वरवर माणसं त्यांचे व्यवहार नेटानं करतांना दिसताहेत पण आतून त्यांना मोर न दिसण्याच्या गंडानं पछाडलय, त्यांच्या आत एक धुमसती अशांतता निर्माण केलीय. मोर तसे निर्धास्त असल्याचे कळतं. ते राजरोस पाण्यात येतात. झाडांआडून छाती भरून ओरडतात. कदाचित पिसाराही फुलवत असतील झाडांआड. इकडं माणसं भूमिका ठरवतांना हताश झाली आहेत. रहस्याच्या गर्भारपणामुळं शहराचं पोट एवढं वाढलं आहे की त्याला आता पाठ टेकवून पडून रहावे लागते सतत. आपण आल्याची बातमी पसरवून शहराला आणखी एक तळं आणि रान काबिज करण्याचं आमंत्रण देणे हा मोरांचा हेतू असेल काय? माणसं युद्धात जास्तच निष्णात झालेली आहेत. त्यांनी कत्तलींचा वेग झपाट्यानं वाढवलाय. मोर आणि शहराच्या नात्यात कधीनव्हे इतका तणाव तयार झालाय. प्रकरण कुणाच्याच हातात राहिलेले नाही. अग्रेसर होण्याचा एकच पर्याय, कुणीही न ठरवलेल्या दिशेने जाण्याचा. पण शहर काहीही म्हणो कुरूप पायांपासून, अद्भुत पिसांपर्यंत जिवंत असणारे मोर सुंदर असतात, लांडोरींसह. मोर म्हणजे माया....इव्हला आवडलेल्या लालबुंद सफरचंदासारखी, सत्यभामेच्या तीक्ष्ण मत्सरासारखी, वनवासानंतरच्या सीतेच्या एकाकी दिवसांसारखी, द्रौपदीच्या अग्निदार कायेसारखी, सराईत त्वचेवरून निथळणा-या आकाशी पावसासारखी, जन्म-मरणामधल्या आयुष्यासारखी, डोंगरासारखी, दरीसारखी, माशाच्या पोटात वाढलेल्या माणसाच्या पोरासारखी, भर समुद्रात वाट हरवलेल्या जहाजासारखी, अनाहुतपणे दुमडलेल्या पानांमधे सापडणा-या देखण्या पण अचेतन मोरपिसांसारखी, लांडोरींच्या पोटाला जड करणार्या गर्भासारखी, पंज्यावर दबा धरून वास घेणा-या शहरासारखी. मोर म्हणजे माया. मोरांसारखी !

हिमांशू

1 प्रतिसाद:

  1. Unknown said...:

    हिमांशू,
    मस्त लिहिले आहेस. मजा आली.
    हे वाचत असतांना लहानपणी आजोळच्या वाड्याच्या तटबंदीवर येऊन बसणारे मोर माझ्याही मनात पिंगा घालू लागले.
    पु.शि.रेगेच्या लच्छीचा मोर डोकावला आणि तो आता बाहेर पडायलाच मागत नाही. हवा तेव्हा मोर जर समोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचे. हेच तर आपल्या हातात असते. नाही का ?
    गिरीश

Post a Comment