पाऊस

‘नव्या मानुन्सचा नवा, ताजा पाऊस चार दिवस अव्याहत पडतो आहे. त्याची लय कमी-जास्त होते. फक्त पावसातच असतो तो ओला अंधार काहीसा विरतो आणि पुन्हा दाटून येतो. अभूतपूर्व उन्हाने पोळलेल्या आणि भवताल आपल्या तापाने भरून टाकणा-या इमारती पावसाच्या सांत्वनाने सैलावत जातात. एकेका कणाने पाऊस आसमंत व्यापून टाकतो. एरवी वर्षभर निरिच्छ वाटणा-या विजेच्या-टेलिफोनच्या-केबल टिव्हीच्या केबल्स; पावसाच्या चिमुकल्या थेंबांची तोरणे बनतात. आरसीसीच्या अभेद्य इमारतीतील एखाद्या चुकार खोबणीत रुजून वाढलेली डेरेदार सदाफुली; गच्चिवरून ओणवी होऊन भिजला रस्ता बघणा-या शाळकरी मुलीसारखी, पावसाने केलेला सृजनोत्सुक पालट न्याहाळत असते. एकीकडे रस्त्यांवरचा अपरंपार चिखल असतो. बेमुर्वत, मनुष्यकेंद्री वापरवादाने फुगत चाललेल्या शहराचे अक्राळविक्राळ शरीर, पावसाने आक्रसून गेलेले असते. रस्तावाढीच्या कत्तलीत बळी गेलेल्या झाडांचे जमिनीलगत कापलेले बुंधे आणि त्यांच्या तळातून बेलाग उर्जेने मुसंडी मारणारे कोवळ्या फुटीचे धुमारे यांनी एकत्र येऊन, निवड करण्याचे जुनेच आव्हान नव्याने आपल्या समोर ठेवलेले असते. या सगळ्यातही पाऊस सामील असतोच. द्वंद्वाच्या आणि द्वैताच्या पेचांना पाऊस उधाण आणतो.
पावसाने, वर्षभर साठून राहिलेल्या इच्छांना वाहते होण्यासाठी पाणी मिळते. छपरांवर साठलेल्या बियांना रुजण्यासाठीची चुकार खोबण शोधायला धावता येते. थेंबांच्या चाहूलीने, त्यांच्या टपटपीने “आपण बी आहोत” हे आठवते, घोकून पाहता येते आणि पावसाच्या बदलत्या लयीवर बसवून कवितांसारखे म्हणतही राहता येते. पावसाने आपले पायही वाहते होतात. मनबुद्धी रोषणाईत गुंतून राहिली तरी वाहत्या पायांनी आपण अनिरुद्ध होतो. आपले काठ विस्तारतात.

खोदलेल्या रस्त्यांची तळी करून वाटा अडवणारा, पत्रांवर आपटत धिंगाणा घालणारा, ओढ्या-नाल्यांकाठच्या दुबळ्या वस्त्यांवर धाऊन येणारा, फुटपाथांवर छत्र्या दुरुस्तीला उकिडव्या बसलेल्या कारागिरांच्या छत्र्यांना न जुमानणारा पाऊस. आंब्याच्या-राधानगरीच्या जंगलांना अधिकच घनदाट करणारा, आंब्याच्या-गगनबावड्याच्या-आंबोलीच्या-फोंड्याच्या घाटांमधून घुमणारा, वळणाचे रस्ते धुक्यात लपेटणारा, भाताच्या खाचरांमधे हिरवे चैतन्न्य पेरणा-या इरल्यांवरून पाझरणारा, पन्हाळ्याच्या-विशाळगडाच्या द-यांमधे; धारांनी-धबधब्यांनी-झ-यांनी झेपावणारा, रंकाळ्याच्या विस्तीर्ण जलाशयावर थेंबांच्या असंख्य पावलांनी धावणारा, कांसच्या पठारांवर रानफुलांनी उमलून येणारा, ठोसेघरच्या विराट दरीत कोसळून, तुषारांचे इंद्रधुनुष्य कड्यांकडे फेकत राहणारा पाऊस.
नव्या-नव्या, सपाट आणि हट्टी डांबरी रस्त्यांवरून चालतानाही पायांना मुळ्या आल्यासारखे वाटते, हातांना फांद्या येतात, त्यांवर भिजलेली पाखरे अंग झाडत बसतात, पानांच्या अग्रांवर जमलेले थेंब जमिनीकडे झेपावतात आणि वाटते पाठीवरची; अगम्य वस्तूंनी भरलेली पोतडी टाकून देण्याचे बळ या पावसात तरी नक्की मिळेल.

1 प्रतिसाद:

  1. vaiju said...:

    Tumhi blog lihayala chalu kelat he ekadam sahi zal.masatch lihilay...

Post a Comment